विसापूर हाल्ट रेल्वेस्थानकावर गोंदिया रेल्वेचा थांबा द्या!
ग्रामपंचायत पदाधिकारी आक्रमक : खासदारांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
...
more...
विसापूर : बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव आहे. येथे विसापूर गोंडवाना हाल्ट रेल्वे स्थानक आहे. कोरोना काळापूर्वी या रेल्वे स्थानकावर गोंदिया - बल्लारपूर आणि बल्लारपूर-गोंदियाकडे धावणाऱ्या सर्व प्रवासी रेल्वे थांबत होत्या. मात्र कोरोना संक्रमण काळ संपुष्टात आल्यावर रेल्वे सेवा कार्यान्वित झाली आहे. मात्र बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकावर गोंदिया बल्लारपूर आणि बल्लारपूर
गोंदियाकडे धावणाऱ्या प्रवासी रेल्वे थांबत नाही. हा रेल्वेचा थांबा पूर्ववत सुरू करा, म्हणून विसापूर ग्रामपंचायतने खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन दिले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकावर कोरोना काळापूर्वी वर्धा बल्लारपूर, बल्लारपूर वर्धा, नागपूर- काजीपेठ, काजीपेठ- नागपूर, गोंदिया बल्लारपूर आणि बल्लारपूर गोंदियाकडे धावणाऱ्या प्रवासी रेल्वे नियमित थांबत होत्या. हा रेल्वेचा प्रवास रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सोयीचा होता. मात्र कोरोना संक्रमण काळ सुरू झाला, त्यावेळी रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वे बंद केली. आजघडीला रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वे सुरू केली आहे. वर्धा बल्लारपूर व बल्लारपूर वर्धा ही प्रवासी रेल्वे विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे थांबत आहे. मात्र गोंदिया बल्लारपूर व बल्लारपूर गोंदिया ही प्रवासी रेल्वे सुरू झाल्यापासून विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकावर थांबत नाही. या मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील भरपूर आहे. मात्र गोंदिया बल्लारपूर व बल्लारपूर-गोंदिया ही प्रवासी रेल्वे थांबत नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. प्रवाशांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. निवेदन देताना सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रीना कांबळे, प्रदीप गेडाम, वैशाली पुणेकर आदी उपस्थित होते.
Hello Chandrapur
Page No. 2 Oct 14, 2022
लोकमत हॅलो चांदपूर