भुसावळ- नांदगाव- नाशिक ही लोकल एक महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून, त्यासाठी तांत्रिक चाचपणी सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) सुधीरकुमार गुप्ता यांनी शनिवारी भुसावळ येथे दिली.
इटलीतील दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणावरून परतल्यानंतर गुप्ता यांनी भुसावळ येथे शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. इटलीमध्ये एसडीए बकोनी स्कूलमध्ये दोन आठवड्यांचे लीडरशिप प्रशिक्षण नुकतेच झाले. प्रशिक्षणात भारतातून रेल्वेचे अधिकारी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून भुसावळ व नागपूर विभागाचे व्यवस्थापक सहभागी झाले होते. प्रशिक्षणाबाबत माहिती देताना डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले, की बदल हे चक्र आहे. इटलीत रेल्वेचे कमी गती, मध्यगती व उच्च गती अशा श्रेणी आहेत. उच्च गतीच्या रेल्वेला भेट देऊन त्यांची माहिती जाणून घेतली. इटलीची आर्थिक स्थिती चांगली नाही. मात्र, स्वच्छतेबाबत भारताबाबत इटलीची स्थिती चांगली आहे. असे असताना तेथील...
more... नागरिकांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अधिक आहे. या प्रशिक्षणामुळे विचार करण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते.
आपल्याकडे अंमलबजावणीतच अडथळे
इटलीमध्ये तिकीट खिडकी नाही. प्रत्येक प्रवाशाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिकीट देण्यात येते. इटलीमध्ये एकच तिकीट काढून रेल्वे व बसचा प्रवास करता येतो. तशी सोय आपल्याकडे नाही. मात्र, चेन्नईमध्ये हा प्रयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात रेल्वेच्या विकासासाठी इटलीप्रमाणे संधी आहे. त्यांच्या आणि आपल्या परिस्थितीत विशेष फरक नाही. फक्त आपल्याकडे कृती करताना अनेक अडथळे असतात, असे गुप्ता यांनी सांगितले.
मुंबईत प्रशिक्षण?
भुसावळ- नाशिक लोकलसेवा सुरू करण्यासाठी तांत्रिक चाचपणी सुरू आहे. या लोकलसेवेबाबत चालक व कर्मचाऱ्यांनी मुंबईत प्रशिक्षण घेतल्याचे समजते. ही लोकलसेवा कुंभमेळ्यातच सुरू होणार होती.
अप-डाऊन सुकर
भुसावळ-नाशिक ही लोकलसेवा भुसावळसह जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड येथे थांबा घेऊ शकेल, अशी शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील अप-डाऊन करणाऱ्या सुमारे साडेतीन हजार प्रवाशांची सोय होईल. ही गाडी सध्या भुसावळला दाखल झालेली आहे. तांत्रिक चाचणीनंतर ती प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होईल, अशी मािहती मिळाली.