प्रवाशांनो रात्री गाडीत बिनधास्त झोपा, रेल्वे प्रशासन तुम्हाला जागवेल
रेल्वेने सुरु केली 'डेस्टिनेशन अलर्ट वेकअपची सुविधा
जळगाव : रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेकवेळा प्रवाशांना गाढ झोप लागल्यास त्यांना संबंधित स्टेशनवर उतरता येत नाही....
more... यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नुकतीच 'डेस्टिनेशन अलर्ट वेकअप' ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे 'प्रवाशाला ज्या स्टेशनवर उतरायचे आहे. त्यावेळी प्रवाशाला स्टेशन येण्याच्या २० मिनिटे आधी रिंग देऊन रेल्वे प्रशासनातर्फे जागे करण्यात येणार आहे.
रेल्वे प्रवासात दिवसापेक्षा रात्रीच्या प्रवासी गाड्यांची संख्या दुपटीने आहे. तसेच बहुतांश प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास करताना रात्रीच्याच प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, प्रवासात झोपल्यावर अनेक प्रवाशांना ज्या स्टेशनवर त्यांना उतरायचे आहे, त्या स्टेशनवर उतरण्यासाठी त्यांना जाग येत नाही.
अशा वेळी त्यांचे स्टेशन सुटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे प्रवाशांसाठी रेल्वेने 'डेस्टिनेशन अलर्ट वेकअपची सुविधा सुरू केली आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेल्वेच्या १३९ या क्रमांकावर फोन करून, चौकशी केंद्राकडे डेस्टिनेशन अलर्ट वेकअपची सुविधा देण्याची मागणी करायची आहे, तसेच प्रवाशांना या सुविधेचा लाभ फक्त रात्री ११ ते सकाळी सातच्या दरम्यान घेता येणार आहे.
असा घ्या सुविधेचा लाभ..
'डेस्टिनेशन अलर्ट वेकअप' या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी १३९ या रेल्वेच्या चौकशी क्रमांकावर फोन करावा. फोन लागल्यावर भाषेची निवड करावी. त्यानंतर फोन सुरू असताना प्रवाशांनी पहिल्यांदा ७ आणि नंतर २ क्रमांक दाबायचा आहे.
चौकशी केंद्रातर्फे संबंधित विभागाकडे फोन गेल्यावर, त्यांना तुमच्या तिकिटावरील पीएनआर नंबर व मोबाइल नंबर सांगायचा आहे. यानंतर काही सेकंदात रेल्वे प्रशासनातर्फे तुमच्या मोबाइलवर डेस्टिनेशन अलर्ट वेकअपची नोंदणी झाली असल्याचा मॅसेज येईल.
तसेच सकाळी तुम्हाला ज्या स्टेशनवर उतरायचे आहे, ते स्टेशन येण्याच्या २० मिनिटे आदी तुम्हाला रिंग व मेसेज देऊन उठविण्यात येणार आहे.
प्रवाशाला ज्या स्टेशनवर उतरायचे आहे ते स्टेशन येण्याच्या २० मिनिटे आधी संबंधित प्रवाशाना झोपेतून उठविण्यासाठी रेल्वेने 'डेस्टिनेशन अलर्ट चेकअप'ची सुविधा सुरु केली आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
- डॉ. शिवराज मानसपुरे, सिनिअर . डीसीएम, भुसावळ रेल्वे विभाग.
सेवेसाठी मोजावे लागणार शुल्क
रेल्वे प्रशासनातर्फे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काहीसे शुल्क कपात करण्यात येणार आहे. या मध्ये मोठ्या स्टेशनवर प्रवाशाला उतरायचे असल्यास फोन कॉल्ससाठी १ रुपया २० पैसे आकारण्यात येतील, तर लहान स्टेशनसाठी २ रुपये आकारण्यात येणार आहेत. तसेच मेसेजच्या सुविधेसाठी प्रती मेसेज ३ रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.